लोहारा/प्रतिनिधी (जि. धाराशिव) : दिवाळी सण हा आनंद, प्रकाश आणि उत्सवाचा काळ असला तरी या काळात सुरक्षिततेची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी नागरिकांना केले आहे.
एपीआय कुकलारे म्हणाले, “दिवाळी निमित्त अनेक नागरिक गावी जातात. अशावेळी शहरातील घरं बंद राहतात आणि चोरट्यांना याचा फायदा घेता येतो. त्यामुळे नागरिकांनी घर सोडताना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व दारे-खिडक्या बंद करून लॉक करावे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अलार्म यंत्रणा कार्यरत ठेवावी. मौल्यवान दागिने, रोख रक्कम, कागदपत्रे बँकेत ठेवावीत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “वाहन पार्क करताना अंधाऱ्या किंवा निर्जन ठिकाणी वाहन ठेवू नये. दुचाकी किंवा चारचाकी वाहन नीट लॉक करून सोडावे. प्रवासादरम्यान सावध राहावे आणि अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.”
कुकलारे यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे आवाहन करत सांगितले की, “संशयास्पद हालचाली, व्यक्ती किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा चुकीची माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये. नागरिकांच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारी आटोक्यात राहते.”
सुरक्षितता हीच खरी दिवाळीची उजळण
लोहारा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी दिवाळीच्या काळात गस्त आणि तपासणी वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. “सणाचा आनंद सुरक्षिततेच्या चौकटीत साजरा करा, फटाके फोडताना मुलांची काळजी घ्या, वाहतूक नियमांचे पालन करा आणि शांततेत दिवाळी साजरी करा,” असे कुकलारे यांनी शेवटी सांगितले.