लोहारा : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलवाडी येथे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रयोग सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. हा सप्ताह ९ ते १५ ऑक्टोबरदरम्यान साजरा होत असून, समारोप १५ ऑक्टोबर रोजी अब्दुल कलाम जयंती आणि वाचन प्रेरणा दिन साजरा करून होणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञानाविषयी आवड निर्माण करणे आणि प्रयोगातून शिकण्याची सवय लावणे असा आहे, अशी माहिती सहशिक्षक विकास घोडके यांनी दिली.
मुख्याध्यापक राजेंद्र माळवदकर यांनी सांगितले की, “दररोज परिपाठामध्ये तीन प्रयोग विद्यार्थ्यांकडून सादर केले जातात. तसेच प्रयोगांचे लेखन करून दृढीकरण केले जाणार आहे.”
विद्यार्थ्यांनी ‘ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते’, ‘हवा जागा व्यापते’, ‘हवेला वस्तुमान असते’, ‘चुंबकीय शक्ती’, ‘ध्वनीलहरी’, ‘पदार्थाच्या अवस्था व अवस्थांतर’, ‘स्थितिक विद्युत बल’, ‘सुवर्णपत्र विद्युतदर्शीचे कार्य’ आणि ‘घर्षणामुळे बल निर्माण होते’ असे अनेक प्रयोग सादर केले.
विज्ञान विभाग प्रमुख सोनाली जगताप यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग केल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो तसेच विज्ञानाविषयीची ओढ वाढते. प्रत्येक वर्गाला दररोज प्रयोग सादरीकरणाची संधी दिली जाते.”
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राजेंद्र माळवदकर, विज्ञान विभाग प्रमुख सोनाली जगताप, तानाजी पाटील, राजकुमार क्षीरसागर, बबिता शिंदे, विकास घोडके आदी शिक्षक मार्गदर्शन करत आहेत.
बेलवाडी शाळेचे हे उपक्रमशील पाऊल चिमुकल्यांच्या विज्ञानप्रेमाची ठिणगी प्रज्वलित करत आहे!