धाराशिव
कैलास रथात ‘खुर्ची’ची व्यवस्था करण्याची नगरसेविका आरती कोरे यांची मागणी

लोहारा (धाराशिव): लोहारा नगरपंचायतीच्या कैलास रथात लिंगायत समाजाच्या धार्मिक परंपरेनुसार ‘खुर्ची’ची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले असल्याने, ही व्यवस्था तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका सौ. आरती ओम कोरे यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरसेविका कोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नगरपंचायतीच्या कैलास रथात मयतास झोपवून अंतविधीसाठी नेले जाते. मात्र, लिंगायत समाजात पारंपरिक रितीरिवाजानुसार मयत व्यक्तीस ‘खुर्ची’वर बसवून अंत्यसंस्कार स्थळी नेण्याची प्रथा आहे. त्यामुळे धार्मिक श्रद्धेचा मान राखण्यासाठी रथात खुर्चीची व्यवस्था असणे आवश्यक आहे.”
कोरे यांनी पुढे नमूद केले की, “ही भावना समाजातील अनेक नागरिकांनी व्यक्त केली असून, श्रद्धा व परंपरेचा आदर राखण्यासाठी नगरपंचायतीने तातडीने ही व्यवस्था करावी,” अशी नम्र विनंती त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना केली आहे.