लोहारा – (11 ऑक्टोबर) : लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्डी येथे पालक आणि शिक्षक यांच्यातील संवाद, समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भव्य पालक मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात गावातील मान्यवर, पालक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नूर पठाण, उपाध्यक्ष तेजकुमार देवकर, तसेच शिक्षणप्रेमी नागरिक अहमदपाशा शेख, दाजीराम देवकर, शाहूराज कदम, देवराव कोकरे, सौ. ज्योती जाधव, सौ. सुजाता जाधव, मुकुंद देवकर, प्रकाश देवकर, बालाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहशिक्षिका वर्षा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना पालकांना आवाहन केले की, “मुलांना नियमित शाळेत पाठवा, दररोज अभ्यासाला बसवा आणि शाळेच्या प्रगतीत हातभार लावा.”
पालक प्रतिनिधी सौ. सुजाता जाधव यांनी आपल्या मनोगतात पालकांच्या अपेक्षा आणि भावना व्यक्त करत सांगितले की, “शिक्षक व पालक यांचा सुसंवादच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”
मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे यांनी पालकांना शाळेच्या प्रगतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वयंशिस्त, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय व मंथन स्पर्धा, शंभर टक्के उपस्थिती, विद्यार्थी कल्याण योजना तसेच शाळेची पटसंख्या वाढविणे अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, “शाळेच्या विकासासाठी शिक्षक तत्पर आहेत, मात्र पालक व गावकऱ्यांचा सहभाग तितकाच आवश्यक आहे. आपली शाळा आपली जबाबदारी समजून प्रत्येक पालकाने पुढे यावे.”
या मेळाव्याला तब्बल ६० पालकांनी हजेरी लावली. मेळाव्यानंतर पालकांनी शाळेच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास माणिकशेट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमाकांत खटके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज बनकर, श्रीमती महानंदा चव्हाण, विनोद कांबळे, माने सर यांनी परिश्रम घेतले.
मार्डी शाळेतील हा पालक मेळावा हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून शिक्षक, पालक आणि समाज यांच्यातील नात्याला दृढ करणारा संवादाचा सुंदर सोहळा ठरला.