
धाराशिव / प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा देणाऱ्या, भूमिपुत्रांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणाऱ्या आणि बंद पडलेल्या निम्न तेरणा प्रकल्पासाठी झटणाऱ्या शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या जिल्हा प्रवक्ते (ग्रामीण) पदी निवड झाली आहे. गुरुवार, दि. ९ रोजी झालेल्या बैठकीत या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. या बैठकीत शहरी जिल्हा प्रवक्ते पदी तानाजी जाधवर यांचीही निवड करण्यात आली.
✳️ संघर्षातून नेतृत्वाचा प्रवास
जगदीश पाटील हे नाव आज शेतकरी चळवळीशी घट्ट जोडले गेले आहे. निम्न तेरणा प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी गेल्या काही वर्षांपासून त्यांनी सलग लढा दिला. प्रकल्पाच्या परिसरातील २३ गावांतील शेतकऱ्यांना एकत्र करून शासनाला निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा कौतुकास्पद ठरला. त्यांच्या नेतृत्वामुळे शासनाने या प्रकल्पाकडे लक्ष देत निधी मंजूर केला.
राज्य आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांच्या समस्या, स्थानिक विकासाचे मुद्दे यावर त्यांनी स्पष्टपणे आवाज उठवला आहे. त्यामुळेच ते आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाम, प्रखर आणि जनाधार असलेले नेते म्हणून ओळखले जातात.
✳️ शिवसेना नेतृत्वाचा सन्मान
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते दोन्ही प्रवक्त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास खासदार ओमप्रकाश (राजे) निंबाळकर, मकरंद राजे निंबाळकर, नेताजी पाटील, बाळासाहेब पाटील, मोईन पठाण (शिवसेना कक्ष जिल्हा प्रमुख), गोविंद गरड, अश्विन पाटील, मारुती दूधभाते, अमित चव्हाण आदी मान्यवरांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.