धाराशिव
लोहारा शहरात ईद-ए-मिलाद उन-नबी निमित्त भव्य जुलूस; सजावट, शरबत-वाटप आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम


लोहारा / अब्बास शेख / प्रतिनिधी
लोहारा शहर आज ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या जल्लोषात न्हाऊन निघाले. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या या भव्य जुलूसात धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोप्याचा संदेश आणि उत्साहाचा सुरेख मिलाफ पाहायला मिळाला.

महेबूब सुभहानी दर्ग्यापासून सुरू झालेला जुलूस छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक मार्गे ईदगाह मस्जिदपर्यंत गेला. मार्गभर झालेली सजावट, फडकणारी पताका, आणि लहान चिमुकल्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती यामुळे वातावरण भारावून गेले होते.

जुलूसात मक्का-मदिना शरीफ व आकसा मस्जिद यांची आकर्षक प्रतीकात्मक चित्रे उभारण्यात आली होती. त्याचबरोबर नाते शरीफ पठणातून समाजप्रबोधनाचे सूर गुंजत होते. शरबत वाटप हेड्डे सिद्धकी परिवाराने तर कुरेशी जमातीतर्फे गुलाबजामून वाटप करून भाविकांची सत्कारमूर्ति करण्यात आली.

या जल्लोषात मुस्लिम समाजाचे धर्मगुरू अबुल वफा कादरी, शाह हुसेन कादरी, हाफीज शमशोदिन उस्मान सिद्धकी, जामा मस्जिदचे सदर हैदर शेख आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली. जुलूस कमिटीचे अध्यक्ष आयूब शेख (एजी बॉस), उपाध्यक्ष इस्माईल मुल्ला, सचिव आमीन सुबेंकर, कोषाध्यक्ष दादा मुल्ला आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी व्यवस्थापनाची सूत्रे यशस्वीपणे हाती घेतली होती.




