लोहारा (प्रतिनिधी) : “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खेड (ता. लोहारा) येथे शालेय परिवार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरवीन शेख, उपाध्यक्षा आश्विनी कांबळे, मुख्याध्यापक काकासाहेब इंगळे, शिक्षक महादेव गव्हाळे, बळीराम आलमले, प्रवीण शिंदे, मोइजोद्दीन सौदागर, सुरेश साळुंके, राहुल भेडे, सुनंदा निर्मले, मल्लिकार्जुन कलशेट्टी यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील मान्यवर व सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या फळझाडे, सावली देणारी झाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. शाळेचे वातावरण हिरवेगार व मनोहारी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा थेट अनुभव देण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
यावेळी शिक्षक बळीराम आलमले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षारोपणाचे महत्त्व स्पष्ट केले. “आजची पेरलेली रोपटी ही उद्याची जीवनदायी झाडे ठरतील. झाडे फक्त ऑक्सिजन देत नाहीत तर माणसाला सावली, फळे, पाणी आणि स्वच्छ हवा देखील देतात. त्यामुळे प्रत्येकाने झाडांचे पालनपोषण स्वतःच्या मुलाप्रमाणे करायला हवे,” असे मार्गदर्शन त्यांनी केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनीही आनंदाने रोपे लावून, त्यांना पाणी घालून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. लहानग्या हातांनी लावलेली ही रोपटी गावातील हरित क्रांतीची नवी सुरुवात ठरणार आहेत.
कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “आजच्या पिढीला पर्यावरणाची जाणीव करून देण्याचा हा खरा मार्ग आहे. झाडे जगली तरच आपला श्वास जिवंत राहील,” असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. खेड शाळेतील या वृक्षारोपण उपक्रमामुळे केवळ शाळा नव्हे तर संपूर्ण गावात पर्यावरणप्रेमी वातावरण निर्माण झाले आहे.