धाराशिव
लोहारा-औसा-उमरग्याचे भाग्यलक्ष्मी निम्न तेरणा प्रकल्प जलाशय भरला क्षमतेने; खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते जलपूजन

लोहारा (प्रतिनिधी) – लोहारा, औसा व उमरगा या तीन तालुक्यांचे भाग्यलक्ष्मी मानले जाणारे निम्न तेरणा प्रकल्प धरण यावर्षी देखील पूर्ण क्षमतेने भरले असून, सोमवारी जलपूजनाचा विधिवत कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी नेते अनिल जगताप व युवा नेते अजिंक्य बापू पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
निम्न तेरणा प्रकल्पाची एकूण पाणी क्षमता 121 दशलक्ष घनमीटर असून सध्या धरण फुल्ल टु कॅपेसिटी भरले आहे. या धरणातील पाण्याचा लाभ लोहारा, उमरगा, औसा, निलंगा व धाराशिव तालुक्यांतील शेतकऱ्यांना होत असून, कृषी व पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून याचे महत्त्व आहे.
धरणावरून धाराशिव शहरापर्यंत पाणीपुरवठा करणारी आशिव उपसा सिंचन योजना, तसेच उजव्या व डाव्या प्रवाही कालव्याद्वारे निलंगा, उमरगा तालुक्यातील शेतशिवार व गावांना पाणीपुरवठा केला जातो. याचबरोबर लोहारा, उमरगा या शहरांसह ग्रामीण भागांनाही या जलाशयातून पिण्याचे पाणी पुरवले जाते. शेतकरी मोटारीद्वारे पाणी उपसा करून ऊस, गहू, ज्वारी आदी पिकांचे उत्पादन घेतात.




