लोहारा ( जि.धाराशिव) : बसवरत्न पुरस्कार सोहळा समिती धाराशिव जिल्ह्याच्या वतीने उमरगा येथे जिल्ह्याचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या विकासात त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास फाउंडेशनचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रवीण स्वामी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष सन्नी पाटील होते. यावेळी खासदार निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी अजिंक्य बापू पाटील, सुभाष जेवळे, शिवकांत पतगे, करण पाटील, इरन्ना बसगुंडे, संदीप लिंबाळे, धनराज हेबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध वक्त्यांनी खासदार निंबाळकर यांच्या कार्याचा गौरव करत, जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे नमूद केले.
सत्कार स्वीकारताना खासदार निंबाळकर म्हणाले की, “जनतेचा विश्वास हीच माझी ताकद असून, शेतकरी, युवक, महिला यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यास मी कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती माने यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप लिंबाळे यांनी मानले.