धाराशिव
जेवळी : श्री मोरया गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जेवळी (ता. लोहारा) : जेवळी येथील श्री मोरया गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. २८) पार पडलेल्या या शिबिरास युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मुंडे, गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष हावळे, बिट अंमलदार कान्तु राठोड, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिंनगुंडे, तसेच गणेश मंडळाचे अध्यक्ष मेघराज कारभारी, उपाध्यक्ष अमरदीप साळुंके, सचिव विशाल कारभारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेने रक्त संकलन केले. यावेळी ग्रामपंचायत लिपिक आप्पासाहेब तांबडे यांनी सलग १९व्यांदा रक्तदान करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
श्री मोरया गणेश मंडळाच्या वतीने उत्सव काळात शालेय स्पर्धा, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटप, तसेच डॉल्बी विरहित मिरवणुकीचा संकल्प राबविण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष रोहित कारभारी यांनी सांगितले की, “या वर्षीच्या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक देखावे सादर करण्यात येणार आहेत.”



