लोहारा : शहरातील बसवेश्वर गणेश मित्र मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 28 ऑगस्ट 2025) समाजोपयोगी उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श मंडळाने घालून दिला. या शिबिरात तब्बल 26 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन रक्तदान केले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष वैजीनाथ माणीकशैटी, उपाध्यक्ष संतोष फावडे, सचिव बाजीराव पाटील तसेच सदस्य नागेश जटटे, रामेश्वर वैरागकर, तमा स्वामी, वीर फावडे, बाळु माशाळकर, राजु स्वामी, आपु स्वामी, श्रीकांत बोराळे, शरद कदम आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करून अशा सामाजिक उपक्रमांमध्ये युवकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
श्रीकृष्ण रक्तपेढी उमरगा यांच्या सहयोगातून हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. रक्तपेढीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगत प्रत्येक थेंब रक्त हा एखाद्या जीवासाठी नवजीवन ठरतो, असे मत व्यक्त केले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबविणे हेच खरी गणेशभक्ती असल्याचा संदेश या शिबिरातून मिळाला. मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून आगामी काळात अधिक मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.