लोहारा : उमरगा-लोहारा तालुक्यातील पाऊसामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे.
निवेदनात असे म्हटले आहे. की, उमरगा व लोहारा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे. विशेषतः लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे मागील दोन दिवसात ६५ मीमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आजतागायत झालेल्या पाऊसामुळे सोयाबीन, उडीद, मुग, तूर आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानुसार जिल्हाभरात अनेक ठिकाणी पंचनामेही सुरु आहेत. परंतु लोहारा तालुक्यात ६५ मीमी पेक्षा कमी पाऊस पडल्याचे कारण दाखवून कुठल्याही प्रकारचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. मागील दोन दिवसात लोहारा तालुक्यात अतिवृष्टी व संततधार मुळे खरीप पिके पाण्याखाली आली आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. तरी उमरगा व लोहारा तालुक्यात पाऊसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देणे बाबत संबंधितांना आदेश निर्गमित करावे अशी मागणी माजी आमदार चौगुले यांनी केली आहे.