लोहारा : लोहारा तालुक्यात 27 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्यावतीने शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, लोहारा तालुक्यातील चारही महसूल मंडळातील अनेक गावांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून शेतात पाणी साचल्यामुळे 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी ओढ्याजवळील शेतीची सुपीक माती वाहून गेली आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे पिके पिवळसर व कमकुवत झाली होती. मात्र, झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, मूग आणि इतर खरीप पिके पूर्णपणे हानीग्रस्त झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ, एनडीआरएफच्या निकषानुसार तसेच दुष्काळ संहिता 2016 नुसार शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक असल्याचे महाविकास आघाडीचे नेते म्हणाले. यासाठी तातडीने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, ॲड. सयाजी शिंदे, नाना पाटील, रौफ बागवान, आयनोद्दीन सवार, माणिक चिकटे, बसवराज पाटील, राजू स्वामी, ओम पाटील, मिलींद नागवंशी, निशिकांत गोरे, तुकाराम वाकळे, रघुवीर घोडके, चिदानंद जट्टे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, कृषी विभागाच्या अहवालानुसार 27 ऑगस्ट रोजी लोहारा तालुक्यात तब्बल 68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे पंचनामा करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.