धाराशिवमहाराष्ट्रराजकीय
“एकट्या झुंजार कार्यकर्त्याचा विजय! अनिल जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; लोहारा-उमरग्याला 86 कोटींची अतिवृष्टी मदत, गावागावातून सत्काराचा वर्षाव”

लोहारा/उमरगा (जि. धाराशिव) :
राजकीय पाठबळ, पद किंवा सत्ता नसतानाही केवळ जिद्द, अभ्यास आणि शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ याच्या जोरावर सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी लोहारा आणि उमरगा तालुक्याला तब्बल 86 कोटी 46 लाख रुपयांची अतिवृष्टी नुकसानभरपाई मिळवून देण्यात ऐतिहासिक यश मिळवलं आहे. त्यांच्या या संघर्षशील आणि परिणामकारक पाठपुराव्याची दखल घेत तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे.
सुरुवातीपासून वगळले गेले लोहारा-उमरगा तालुके :-
खरीप 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले होते. 8 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा प्रशासनाने कळंब, धाराशिव आणि वाशी या तीन तालुक्यांसाठीच शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला. यामध्ये लोहारा व उमरगा तालुक्यांची वजावट झाल्याचे लक्षात आल्यानंतर, अनिल जगताप यांनी तात्काळ ही बाब तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे मांडली. त्यांच्या सूचनेनुसार महसूल व कृषी विभागाने नवीन प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला.
प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहोचला, पण निर्णय रखडला :-
प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाने 28 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात पाठवला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून सहा वेगवेगळ्या जीआर प्रसिद्ध झाले, मात्र लोहारा आणि उमरगा यांना पुन्हा वगळण्यात आले. ही अन्यायकारक परिस्थिती पाहता जगताप यांनी 30 एप्रिल रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांच्या सोबत आमदार प्रवीण स्वामी, सक्षणा सलगर, अजिंक्य पाटील, अमोल बिराजदार यांसारखे कार्यकर्ते होते.
थेट सचिवांपर्यंत पोहोचवला प्रस्ताव:
प्रस्ताव मंत्रालयात अडकलेला असताना, अनिल जगताप यांनी तो प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव कैलास गायकवाड यांच्या थेट हातात सुपूर्त केला. तरीही निर्णय होत नसल्याने नारंगवाडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
अखेर संघर्षाला मिळाले यश :-
शेवटी 29 जुलै 2025 रोजी शासनाने निर्णय घेतला. त्यानुसार
-
लोहारा तालुक्यातील 30,652 शेतकऱ्यांना 33 कोटी 70 लाख
-
उमरगा तालुक्यातील 49,682 शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाखरुपये अनुदान मंजूर करण्यात आले.