धाराशिव (प्रतिनिधी) : लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी तुकाराम बिराजदार यांच्या जमिनीवर मोबदला न देता उभारण्यात आलेल्या सौर व पवन ऊर्जा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक पाऊल उचलले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिलेल्या ई-मेल निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेत मंत्रालयातील ऊर्जा विभागाकडे चौकशीचे आदेश दिले आहेत.
तुकाराम बिराजदार यांनी आपली व्यथा तालुका आणि जिल्हा प्रशासनासमोर मांडली होती. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. त्यावेळी त्यांच्या पाठिशी उभे राहत अनिल जगताप यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत ई-मेलच्या माध्यमातून अन्यायाचा मुद्दा मांडला.
धाराशिव जिल्ह्यात सध्या विविध ठिकाणी सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांची कामे सुरू असून, शेतकऱ्यांना नाममात्र मोबदला देऊन त्यांच्याकडून ३० वर्षांचे करारपत्र घेतले जात असल्याचा गंभीर आरोप जगताप यांनी आपल्या निवेदनात केला होता. यासोबतच, सामाजिक वनीकरण व पाटबंधारे विभागाच्या जमिनींवर प्रकल्प उभारले जात असून, स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली होती.
मुख्यमंत्री कार्यालयाने तात्काळ ऊर्जा विभागाला चौकशीचे आदेश देत श्री. जगताप यांना पुढील संपर्कासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे श्री. बिराजदार यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, इतर शेतकऱ्यांनाही या निर्णयामुळे नवा दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणावर बोलताना अनिल जगताप म्हणाले, “विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर मी मागे हटणार नाही. शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे.”
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या श्री. जगताप यांच्या या हस्तक्षेपामुळे लोहारा तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. शेतकरी वर्गातून त्यांच्या कार्याची सरस कौतुक होत असून, अन्यायाविरोधातील त्यांचा ठाम पवित्रा भविष्यातील संघर्षासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.