धाराशिवमहाराष्ट्र

सौर-पवन कंपन्यांची शेतकऱ्यांवर दडपशाही? अनिल जगतापांनी दिला लढ्याचा इशारा

धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात झपाट्याने विस्तारणाऱ्या सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांच्या सावलीत आता शेतकऱ्यांवरच अन्याय सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अन्यायाविरोधात शेतकरी नेते अनिल जगताप आक्रमक झाले असून, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे तक्रार सादर केली आहे.

लोहारा तालुक्यातील होळी येथील शेतकरी तुकाराम बिराजदार हे तहसील कार्यालयासमोर मुलगा व मुलीसह उपोषणाला बसले आहेत. कारण? बी एन पीक पावर कंपनीने त्यांची चाळीस आर जमीन बळजबरीने ताब्यात घेतली असून, मोबदला तर नाहीच, उलट धमक्या देऊन अरेरावी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काल शेतकरी नेते अनिल जगताप यांनी उपोषण स्थळी भेट देऊन शेतकऱ्याची बाजू ऐकली आणि लगेचच मुख्यमंत्र्यांना याबाबत थेट तक्रार केली. जगताप यांनी उघडपणे सांगितले की – शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू असून, काही कंपन्या अल्प मोबदल्यात जमीन लीजवर घेत आहेत. कायदेशीर करार समजावून न सांगता 28 ते 30 वर्षांचे करार करून ती जमीन हस्तांतरणासारखीच वापरली जाते.

तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. उदा. –

वृक्षतोडीबाबत कोणतीही परवानगी न घेता थेट झाडे कापली जात आहेत,

पाटबंधारे व सामाजिक वनीकरण विभागाच्या जमिनीवर टॉवर व पोल उभारले जात आहेत,

जिल्हा व तालुका पातळीवरील परवानग्यांचा अभाव असूनही प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

तसेच, तालुका जिल्हा सनियंत्रण समितीची नियमावली जाहीर करून ती सर्वसामान्य जनतेस माहीत करून द्यावी, अशी स्पष्ट मागणीही अनिल जगताप यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

“शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कंपन्या त्यांच्यावर अन्याय करत आहेत. या संदर्भात मी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (मेडा), तहसील कार्यालय व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेत आहे. जर दोन आठवड्यात शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण झाले नाही, तर धरणे आंदोलन, मोर्चा किंवा आमरण उपोषणासारखी तीव्र आंदोलने छेडण्यात येतील. अन्याय करणाऱ्या कंपन्यांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही.”

अनिल जगताप, शेतकरी नेते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!