लोहारा (प्रतिनिधी) — हरित धाराशिव अभियान 2025 अंतर्गत येत्या 19 जुलै 2025 रोजी वृक्षलागवड मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी संतोष राऊत तथा नोडल अधिकारी वृक्षारोपण (ग्रामीण लोहारा) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.
या बैठकीला लोहारा तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, गटविकास अधिकारी जगदेव वग्गे, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत उपजिल्हाधिकारी राऊत यांनी वृक्षारोपणाच्या पूर्व तयारीबाबत सविस्तर चर्चा करून, उर्वरित तयारी पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. वृक्षलागवडीला एक सामाजिक चळवळ बनवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.