लोहारा (प्रतिनिधी) लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष हाजी आमीन सुंबेकर यांनी आज हायस्कूल लोहारा येथील शाळेला सदिच्छा भेट देत पोषण आहाराच्या दर्जाची तपासणी केली. विद्यार्थ्यांबरोबर बसून त्यांनी पोषण आहाराची चव घेतली आणि शाळेतील जेवण व्यवस्थेचे मनःपूर्वक कौतुक केले.
या प्रसंगी हायस्कूल लोहारा प्रशालेच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. शाळेतील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी उपनगराध्यक्षांचे हार्दिक स्वागत करून त्यांच्या उपस्थितीने प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

उपनगराध्यक्ष सुंबेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाबरोबरच आरोग्य व पोषणाचे महत्व पटवून दिले. त्यांनी शाळेतील स्वयंपाकघराचीही पाहणी केली व स्वच्छता आणि आहार व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले.
“विद्यार्थ्यांचे भविष्य घडवताना त्यांचे आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पोषण आहाराची गुणवत्ता कायम राखणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व स्वयंपाक कर्मचाऱ्यांनी उपनगराध्यक्षांच्या या सहृदय भेटीचे स्वागत करत या प्रकारच्या भेटींमुळे शाळेतील कार्यास नवी ऊर्जा मिळते, असे सांगितले.
Back to top button
error: Content is protected !!