शैक्षणिक
न्यू व्हिजन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला शिवरायांचा गौरवशाली इतिहास

लोहारा : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवला. या सहलीचे मुख्य आकर्षण अकलूज येथील शिवसृष्टी संग्रहालय होते, जिथे विद्यार्थ्यांना शिवचरित्राच्या महत्त्वपूर्ण घटनांचा अभ्यास करता आला.
सहलीची सुरुवात विद्यार्थ्यांनी सयाजीराव वॉटर पार्कमध्ये मनमुराद आनंद लुटून केली. त्यानंतर शिवसृष्टी संग्रहालय पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची शपथ, रायगड राज्याभिषेक, अफजलखान वध, सुरतेची लूट, बाजीप्रभूंची घोडखिंडीतील शौर्यगाथा, तानाजी मालुसरे यांचे बलिदान आणि इतर ऐतिहासिक प्रसंगांच्या देखाव्यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला.
याशिवाय, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पन्हाळगड, सिंधुदुर्ग, कोंढाणा यांसारख्या शिवरायांनी जिंकलेल्या आणि बांधलेल्या किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांनी मिळवली. या ऐतिहासिक सहलीचा शेवट शिवछत्रपती मल्टिमीडिया म्युझिकल लेझर शोने झाला, ज्यामध्ये शिवचरित्राच्या महत्त्वपूर्ण घटनांचे सादरीकरण संगीत व प्रकाशाच्या सहाय्याने करण्यात आले.




