आष्टाकासार येथे आज पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन

लोहारा, : तालुक्यातील आष्टाकासार येथे २० ऑगस्ट रोजी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षपद लातूरचे ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे हे भूषविणार आहेत. माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती समीक्षा फाऊंडेशनचे मुख्य प्रवर्तक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
समीक्षा फाऊंडेशन, लुब्बिनी बुद्ध विहार ट्रस्ट, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व बुद्धत्व सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि संबोधी महिला मंडळाच्या वतीने आष्टाकासार येथे पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलन होत आहे. गेली अकरा वर्षे समीक्षा फाऊंडेशन शैक्षणिक, सामाजिक, साहित्य यासह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. समाज, साहित्य, धर्म आणि संस्कृती क्षेत्रातील घडामोडीचे पडसाद साहित्यात पडत असतात. साहित्य शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे, साहित्य विचार रुजावा, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मूल्यावर आधारित संविधान मूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी पहिले आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन केल्याचे समीक्षा फाऊजेशनचे मुख्यप्रवर्तक डॉ. डी. टी.गायकवाड यांनी सांगितले. यंदाचे पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन कालकथित तुकाराम गोविंद गायकवाड यांच्या २४ व्या स्मृतिदिनानिमित्त २० ऑगस्ट रोजी आष्टाकासार येथील लुबिनी बुद्ध विहाराच्या प्रांगणात होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे भूषविणार आहेत. अंबाजोगाई येथील परिवर्तन चळवळीचे प्रा. गौतम गायकवाड स्वागताध्यक्ष म्हणून राहणार आहेत. साहित्यिक विष्णू सगर, सरपंच सुलभा काबळे, अॅड. सयाजी शिंदे, वसंत सुलतानपुरे, व्यंकट चौधरी, नरसाप्पा शिदोरे, शिवमूर्ती फुंडीपल्ले, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभा तोरकडे, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी कवी संमेलन, विविध विषयावर परिसंवाद हेणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ लेखिका सुरेखा शहा, आंबेडकरी साहित्यिक व ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे, लोहारा येथील पत्रकार नीलकंठ कांबळे यांना समीक्षा फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.