विद्यार्थ्यांना स्व-अनुभवातून शिक्षण देणे काळाची गरज – सुभाष चव्हाण

उस्मानाबाद : नूतन वर्षाचे स्वागत व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा आणि माता पालकांची रांगोळी व डिश डेकोरेशन स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका मयुरी बिराजदार, आरती कोरे, माजी जि.प.सदस्या मीराताई फुलसुंदर, समाजसेविका रंजनाताई हासुरे, प्रमुख वक्त्या म्हणून ब्रम्हा कुमारी सरिता बहणजी, परिक्षक विद्या मक्तेदार, सचिन शिंदे, प्राचार्य शहाजी जाधव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांना पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे प्रास्ताविक करताना शहाजी जाधव यांनी सांगितले की, 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या सात दिवसात स्कूलमध्ये रेंबो वीक सेलिब्रेशन निमित्त हस्ताक्षर, चित्रकला, गीत गायन, पाठांतर, क्रिडा स्पर्धा असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबवून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यानंतर आपल्या मार्गदर्शनात सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, लहान वयामध्ये विद्यार्थ्यांना काय करावे व काय करू नये याबाबत आपण सांगून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातुन शिक्षण देणे हि काळाची गरज बनली आहे.
यावेळी उपस्थित माता पालकांना मार्गदर्शन करताना सरिता बहणजी यांनी सांगितले की, आपल्या पाल्यास पालकांनी मोबाईलपासून दूर ठेवून त्यांना वेळ देवून प्रेम,जिव्हाळा, वाढविणे गरजेचे आहे. यानंतर रंजनाताई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज जर प्रत्येक आईस आपला मुलगा शिवाजी बनावा वाटत असेल तर अगोदर आईने स्वतः जिजाऊ बनले पाहिजे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शेतकरी, सैनिक,डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, स्वामी समर्थ, छ.शिवाजी, संभाजीराजे, डॉ.आंबेडकर, पंडित नेहरू, झाशीची राणी, सावित्रीबाईं फुले, जिजाऊ, आदिवासी अशा विविध वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली, मास्क वापरा, सॅनिटायजरचा उपयोग करा असे सांगून कोरोना विषयी जनजागृती केली. यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते एका विद्यार्थ्याने नवरदेवाच्या वेशभूषेत येवून मला बायको मिळेल का हो? असे आताच्या तरुणाची व्यथा मांडताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.
तसेच माता पालकांनी डिश डेकोरेशन स्पर्धेमध्ये गाजर व भोपळ्याचा हलवा, गुलाबजामून , खीर, नारळ्याच्या वड्या, फ्रूट सॅलड, ढोकळा, समोसे, दही धपाटी, बाजरीची भाकरी, व्हेज बिर्याणी,पुलाव, पावभाजी, भेळ, कोफ्ते, मंचुरियन, इडली, मेंदू वडा इत्यादी चविष्ट व सुंदर खाद्यपदार्थ बनविलेले पाहून परीक्षकांच्या तोंडास पाणी आले होते. तसेच सुंदर व आकर्षक रांगोळ्या काढून मुलगी शिकवा, पाणी वाचवा, झाडे लावा, असे सामाजिक संदेश आपल्या रांगोळीतून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी होगाडे, सरिता पवार यांनी तर आभारप्रदर्शन सविता जाधव यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सिद्धेश्वर सुरवसे, सोमनाथ कुसळकर, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, मयुरी नारायणकर, मीरा माने, संतोषी घंटे, चांदबी चाऊस, निलोफर बागवान, स्वामींनी होंडराव, शिवानी बिडवे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.