लोहारा शहरात आढळले डेंग्यु, चिकुनगुनियाचे रुग्ण

लोहारा : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात साथ रोगाचा फैलाव होऊ लागला आहे. डेंग्यूचा एक, चिकुनगुनियाचे दोन असे तीन रूग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे सुरू करून पाण्यामध्ये अॅबेट औषध टाकण्याचे काम हाती घेतले आहे.
पावसाळ्यात साथ रोगाचा फैला मोठ्या प्रमाणात होतो. परंतु लोहारा शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर साथरोग हातपाय पसरत आहे. साथ रोगाचे रूग्ण आढळून येत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शहरातील प्रभाग १७ मध्ये एक डेंग्यूचा व दोन चिकुनगुनियाचे रूग्ण आढळून आले आहेत. यात एक महिला व दोन पुरूषांचा यात समावेश आहे. यातील एकाला ताप येणे, डोके दुखी, अंगावर पुरळ येत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या विविध तपासणी केल्यानंतर डेंग्यूचे निदान झाले. तर इतर दोघांना चिकुनगुनिया आजार झाल्याचे स्पष्ट झाले. शहरात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रूग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. डेंग्यू, चिकुनगुनियासारखे साथ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रभाग १७ मधील घरोघरी जाऊन कंटेनर सर्वे सुरु करण्यात येत आहे. ज्या भांड्यांमध्ये (कंटेनर) डासअळी असेल त्यात अबेट टाकण्याचे काम हाती घेतले आहे. बुधवारपर्यंत (ता. सात) जवळपास दीडशे घरांचा सर्वे करून पाण्यात औषध टाकण्यात आले आहे. यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयातील किटक समाहारक ओ. बी. सोळंके, आरोग्य सहायक संजय शिंदे, एस. एन. कागे, आरोग्य सेवक ए. बी. जगताप, आय. पी. गाटे, व्ही. एन. चव्हाण, सागर पवार आदी आरोग्य कर्मचारी यांनी काम हाती घेतले आहे.
डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करावीत, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, डासरोधक क्रीम, औषधे, कॉइल यांचा वापर करावा तसेच अंगभर कपडे परिधान करावे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्त ताप, डोक्याच्या पुढील भागात, डोळ्यांच्या मागील भागात वेदना, अंग दुखणे, मळमळ-उलटी, अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसून आल्यास त्वरीत दवाखान्यात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावे.
डॉ. रहीम शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, लोहारा