विद्युत तारेची ठिणगी पडून दोन हेक्टर ऊस, ठिबक संच जळून लाखो रूपयांचे नुकसान

जेवळी (जि.उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील भोसगा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतात विद्युत तारेची ठिणगी पडून दोन हेक्टर ऊस आणि ठिबक संच जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील भोसगा पाटीजवळ राम गुंजोटे यांचे शेत आहे. गट क्रमांक 122 मधील ऊसाच्या क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वीजेच्या तारेचे घर्षण होवून ऊसात ठिणगी पडली आणि दोन हेक्टर वरील ऊसाने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आग ऊसाच्या मध्यभागी लागल्याने लवकर समजले नाही.
ऊसाला आग लागल्याचे समजताच भोसगा येथील युवक मदतीसाठी धावून आले पण ऊसाच्या फडात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागली होती त्यामुळे येथील युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले पण अंधार पडल्याने त्याचा फायदा झाला नाही त्यामुळे दोन हेक्टर वरील ऊस आणि ठिबक संच जळून खाक झाले. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
.यावेळी भोसगा येथील माजी उपसरपंच वैजीनाथ कागे, अंबाजी सोमंवशी,यल्लालिंग एकुंडे, सतिश दासिमे,रमेश दासिमे,अनवर शहा,यशवंत मानाळे,रोहन सोनकांबळे, रोहित गायकवाड, पंडित मानाळे,परमेश्वर थोरात यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
🔴सलग दोन वर्षे ऊस जळाला
राम गुंजोटे यांचे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात विजेचा तारेचे शार्टसर्किट होवून याच क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला होता. त्यावेळी ही तक्रार दिली होती परंतु याबाबत कोणीही दखल घेतली नाही त्यामुळे यावर्षी पुन्हा दोन हेक्टर ऊस जळून नुकसान झाले.
राम गुंजोटे शेतकरी भोसगा
🔴निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका
दक्षिण जेवळी येथील 33 केव्ही उपकेंद्रातून भोसगा या गावासाठी आष्टामोड मार्गे (गावठाण) सिंगल फेज या लाईनचे काम दोन वर्षापूर्वी केले आहे परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून पावसाचे चार थेंब ही या लाईनला सोसत नाहीत आणि वीज पुरवठा खंडित होतो.
वैजीनाथ कागे माजी उपसरपंच भोसगा
🔴राम गुंजोटे यांच्या शेतातून सिंगल फेज (गावठाण) 33 केव्ही,आणि शेतीला वीज पुरवठा करणारे अशा तीन विद्युत तारेचे लाईन यांच्या शेतातून गेले असून त्यासाठी शेतात बावीस पोल रोवण्यात आले आहेत त्याचाही मोठा त्रास येथील शेतकऱ्यांला सहन करावा लागत आहे.
🔴अनर्थ टळला
पंधरा दिवसापूर्वी भोसगा पाटी ते भोसगा गावात जाणाऱ्या रस्त्यावर शार्टसर्किट होवून वीजेची तार तुटून पडली होती त्यावेळी जवळच टँक्टर थांबली होती म्हणून तार टँक्टर वरती पडली अन्यथा दिवाळी सणाच्या अगोदर मोठा अनर्थ टळला.