बिरुदेवाच्या मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व शिखर कळसारोहन संपन्न

सुधीर कोरे

जेवळी, (ता.लोहारा जि.धाराशिव )

जेवळी (ता लोहारा) येथे जवळपास पंचवीस लाख रुपये खर्चून जिर्णोद्धारा केलेल्या बिरुदेवाच्या मंदिरात रविवारी (ता.१७) मठाधीश श्री म.नि.प्र. गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत मूर्ती प्राण प्रतिष्ठापना व शिखर कळसारोहन कार्यक्रम पार पडला. यानिमित्त येथे गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून शुक्रवारी (ता.१५) ह.भ.प. हरी लवटे महाराज (तुरोरी) व शनिवारी (ता.१६) ह.भ.प. महेश महाराज (माकणी) यांचे किर्तन सेवा पार पडली. या प्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेवळी येथे श्री बिरुदेवाची पुरातन मंदिर आहे. हे मंदिर जीर्ण झाल्याने येथील श्री बिरुदेव मंदिर कमिटी व ग्रामस्थांनी या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडला होता. गेल्या दिड वर्षापासून मंदिर समितीने जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. आता जवळपास पंचवीस लक्ष रुपये खर्चून बांधकाम पूर्ण केले असून यासाठी निधी ही जेवळी व परिसरातील भाविक भक्ताकडून संकलन करण्यात आले आहे.

या मंदिराचा गाभारा दगडी हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आला असून श्री बिरुदेवाची मूर्त ही कर्नाटकातील बादामी शेल्लीकेरी दगडा पासून बनविलेली आहे. रविवारी (ता.१७) ब्राह्मी मुहूर्तावर वेद मूर्ती बसवराज शास्त्री यांच्या धार्मिक विधीना सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास मठाधीश श्री. मनिप्र गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, बाशिंग बांधणे व शिखर कळसारोहन कार्यक्रम पार पडला.

यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यानिमित्त येथे गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. शुक्रवारी (ता.१५) ह.भ.प. हरी लवटे महाराज (तुरोरी) किर्तन सेवा पार पडली. शनिवारी (ता.१६) गावातील मुख्य रस्त्याने कळस मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे शुभारंभ तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे गटा) जिल्हा संघटक ॲड दिपक जवळगे, निवृत्त उपकार्यकारी अभियंता विरुपाक्ष स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मिरवणुकीत पाच गावाच्या पालख्या, परिसरातील भजनी दिंड्या, १०१ धनगरी ढोल, जलकुंभ घेऊन अनेक महिला सामील झाल्या होत्या. संध्याकाळी ह.भ.प. महेश महाराज (माकणी) यांचे किर्तन सेवा पार पडली. यावेळी परिसरातील धनगर समाज बांधवासह सर्व जाती धर्माचे भाविक भक्त सहभागी झाले होते. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री बिरुदेव मंदिर कमिटी व गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!