प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांची उचलबांगडी; धाराशिवचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पदभार

लोहारा : शिक्षकांच्या आंदोलनानंतर अखेर प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धाराशिवय पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी असरार सय्यद यांच्याकडे एक वर्षासाठी अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी गुरूवारी (ता.३) एका पत्राराद्वारे आदेशीत केले आहे.
लोहारा येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी व तालुक्यातील शिक्षकांमध्ये मागील काही महिन्यांपासून बेबनाव निर्माण झाला होता. गंटशिक्षणाधिकारी मैंदर्गी या शिक्षक, कर्मचाऱ्यांची कामे वेळेत न करता त्यांची जाणीवपूर्वक अडवणूक करून त्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला होता. आज ना उद्या गटशिक्षणाधिकाऱ्यांमध्ये बदल होईल, या अपेक्षेने शिक्षकांनी सारे काही निमूटपणे सहन केले. परंतु त्यांच्यात किंचितही बदल न झाल्याने शिक्षक संघटनांनी मैंदर्गी यांच्या मनमानी कारभाराविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर बुधवारी (ता.२) धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाचे दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांनी वादग्रस्त गटविकास अधिकारी मैंदर्गी यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी धाराशिव पंचायत समितीचे गटशिक्षणाअधिकारी असरार सय्यद यांच्याकडे एक वर्षासाठी पदभार सोपविला आहे. याबाबतचा आदेश गुरूवारी जारी केला आहे.
धाराशिव पंचायत समितीचे गटशिक्षणाअधिकारी असरार सय्यद यांच्याकडे लोहारा गटशिक्षणाअधिकारी पदाचा एक वर्षासाठी पदभार सोपविला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुदर्शन जावळे,विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, संतोष देशपांडे, बिभिषण पाटील, राहुल भंडारे, परमेश्वर सुर्यवंशी यांच्यासह आदींनी सत्कार केला आहे.