आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याच्या कुटुंबाला अंत्यसंस्कार प्रसंगी शोकसभेत गावकऱ्यांनी केली दोन लाख रुपयाची मदत

जेवळी, ( ता.लोहारा ) / सुधीर कोरे
वाडी वडगाव (ता. लोहारा) येथील आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याच्या कुटुंबांला अंत्यसंस्कार प्रसंगी शोकसभेत केलेल्या आव्हानाल प्रतिसाद देत गावकऱ्यांनी केली दोन लाखाची मदत, कोरड्या श्रद्धांजली ऐवजी उदरनिर्वाहसाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला केलेल्या या आर्थिक मदतीची परिसरात मोठी कौतुक होत आहे.
वाडी वडगाव (ता. लोहारा) हे जवळपास दोन हजार लोकसंख्येचे गाव. येथील बसवराज बापूराव लकडे (वय- ४२) हे आपली आर्थिक परिस्थिती हालायकीचे असल्याने दहा वर्षीपासून कामा निमित्त कुटुंबासह कोकणात गेले होते. कोरोना काळात लॉकडाऊमुळे उदरनिर्वाहाचे साधने बंद पडल्याने ते गावी येत आपली वडिलोपार्जित पाच एकर शेती कसायला सुरुवात केली होती. परंतु शेतीत अपेक्षित उत्पन्न निघत नव्हते. दोन वर्षांपूर्वी शेत पेरणी योग्य करण्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केला होता. परंतु निसर्गाचा लहरीपणामुळे शेतात केलाही खर्च निघाले नाही. उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ लागत नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. यातून बचत गट व खाजगी सावकाराकडून एक लाखापर्यंत कर्ज काढले होते. आता यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा या विवेंचनेत होते. शेवटी बसवराज लकडे यांनी रविवारी (ता.२१) आपल्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन मुले असा परिवार आहे. पहिली मुलगी अकरावीला व शेवटचा मुलगा हा तिसरीला आहे. मयत बसवराज हे जन्मल्यानंतर पाच दिवसाने त्यांचे वडील हे वारले होते. त्यांच्या आईनेच मोलमजुरी करीत चौघां (दोघे भाऊ व दोन बहिणी) भावंडांना वाढविले होते. हीच परिस्थिती पुन्हा त्यांच्या मुलावरही आली याची गावात हळहळ व्यक्त होत होती. सोमवारी मयताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या शोकसभेत येथील शिक्षक दयानंद पाटील, पैलवान प्रा. धनराज भुजबळ, डॉ. संजय गिराम, अरुण बोडके, पै. अंकुश भुजबळ यांनी, नुसती श्रद्धांजली वाहण्यापेक्षा बसवराज लकडे याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच शिक्षण यासाठी मदत म्हणून काही रोख रक्कम देता आली तर बसवराजना खरी श्रद्धांजली ठरेल असे आवाहन केला. यावेळी अंत्यसंस्कारासाठी आलेल्या गावकऱ्यांनी त्वरीत मदतीचा हात पुढे केला. याप्रसंगी दत्तात्रय गिराम, धनराज भुजबळ, ब्रम्हानंद भुजबळ,
अरूण बोडके, बबन स्वामी यांनी प्रत्येकी अकरा- अकरा हजार रुपये आर्थिक मदत दिली आहे. या बरोबरच उपस्थित नागरिकांनी आपापल्या परीने आर्थिक मदत दिली. यानंतर ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरगावी असलेल्या नागरिकांना समजल्यानंतर त्यांनीही मदत पाठवू दिली आहे. आता पर्यंत जवळपास दोन लाख रुपये जमा झाल्याची माहिती शिक्षक दयानंद पाटील व दयानंद भुजबळ यांनी दिली आहे. या छोट्याशा गावातील नागरिकांनी शोकसभेत केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करीत इतरांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.