मराठा समाजाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण

लोहारा ( जि.उस्मानाबाद ) : सारथी पुणे व एमकेसीएल पुणे यांच्या द्वारे “छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” संपूर्ण महाराष्ट्रात तालुकास्तरापर्यंत राबविण्यासाठी मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या युवांसाठी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शविल्याप्रमाणे प्रशिक्षणासमोर नमूद पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. दहावी पास शैक्षणिक अट आहे.
प्रशिक्षण खर्च सारथी, पुणे मार्फत करण्यात येईल. उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे एमकेसीएल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमार्फत (ALC) महाराष्ट्र पातळीवर राबविण्यात येईल. सदर प्रशिक्षण हे अनिवासी (Non Residential ) असून, प्रशिक्षणादरम्यान राहणे व जेवणाची व्यवस्था उमेदवारास स्व:खर्चाने करावी लागेल.
♦ मराठा, कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा-कुणबी समाजाच्या नॉन क्रिमिलेयर गटाच्या वयोगट 18 ते 45 मधील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दिनांक 16/01/2023 पासून सादर करावेत. संबंधित उमेदवारांनी एमकेसीएल संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी.
♦ प्राप्त अर्जामधून निकषाच्या आधारे अर्जाची छाननी करून व प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. पात्र उमेदवारांची यादी संकेत स्थळावर (www.mkcl.org/csmsdeep) योग्य वेळी प्रसिद्ध करण्यात येईल, अपूर्ण असलेले तसेच मुदती नंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
♦ मराठा उमेदवारास जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर / EWS (Economically Weaker Section) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कुणबी, कुणबी मराठा व मराठा-कुणबी उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
♦ उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल.
♦ प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी www.mkcl.org/csmsdeep या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्येच सोडून जाता येणार नाही.
♦ प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांचे घटक कालावधी, स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील.
ऑनलाईन नोंदणी सुरू होण्याचा दिनांक :- 16/01/2023, प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख: 01/02/2023
प्रशिक्षण ठिकाण: एमकेसीएल संस्थेचे अधिकृत अध्ययन केंद्र (ALC). सारथी व MKCL यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या प्रशिक्षण केंद्रांची यादी पहावी.
उमेदवाराने ऑनलाईन अर्जासोबत अपलोड / जोडावयाची कागद पत्रे :-
१) विहीत नमुन्यातील व फोटोसहित परिपूर्ण अर्ज
२) प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र (किमान दहावी पास)
३) सक्षम अधिकान्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी SDO यांचे प्रमाणपत्र )
४) जन्म दाखला
५) नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र / मागील तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी / तहसीलदार यांचे प्रमाणपत्र) ६) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (तहसीलदार यांचे महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत प्रमाणपत्र (Domicile Certificate)
७) आधार कार्ड
८) उमेदवाराचा फोटो
९) उमेदवाराची सही
20 हजार रुपये फी असलेला कॉम्पुटर डिप्लोमा कोर्स “CSMS-DEEP” Sarathi या महाराष्ट्र शासन संस्था व MKCL मार्फत पूर्ण पणे मोफत लोहारा शहरातील फिनिक्स कॉम्पुटर्स येथे शिकायला भेटणार आहे. तरी पात्रताधारकांनी नोंदणी करावी.