धाराशिवकृषीमहाराष्ट्र

धाराशिवच्या दुष्काळी परिस्थितीच्या व्यथा विभागीय आयुक्तांसमोर मांडल्या

छत्रपती संभाजीनगर येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा

लोहारा (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (दि. २३) सायंकाळी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेऊन मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अनिल जगताप यांनी विभागीय आयुक्तांसमोर व्यथा मांडल्या.

धाराशिव जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगाराचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न, शेतसारा माफ करणे, रखडलेल्या पीकविमा रकमेचे वितरण आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

तसेच खरीप २०२५ मधून वगळण्यात आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील १४ महसूल मंडळांतील पीक नुकसान भरपाईचा प्रश्नही प्रामुख्याने विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या मागण्यांबाबत शासनाकडे तातडीने शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्याचे शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सांगितले.

आ.रोहित पवारांनी दिली संधी

आमदार रोहित पवार यांनी बुधवारी सकाळीच सूचना करून शेतकरी नेते अनिल जगताप यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे बोलावून घेतले. विभागीय आयुक्तांसमोर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी करण्याची संधी दिल्याबद्दल जगताप यांनी रोहित पवार यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यातील विविध जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!