धाराशिव

लोहाऱ्यात रोड रोमिओंचा हैदोस; विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मनविसे आक्रमक

पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर; कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा

लोहारा | प्रतिनिधी

लोहारा बसस्थानक तसेच शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात वाढत चाललेल्या रोड रोमिओंच्या त्रासामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पोलीस निरीक्षक, लोहारा यांना निवेदन देत कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, विशेष पथक आणि छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


निवेदनात म्हटले आहे की, लोहारा हे तालुक्यातील प्रमुख शैक्षणिक केंद्र असून दररोज शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात. मात्र बसस्थानक, महाविद्यालय परिसर व मुख्य रस्त्यांवर काही समाजकंटकांकडून विद्यार्थिनींची छेडछाड, पाठलाग, अश्लील शेरेबाजी, मोठ्या आवाजात गाणी वाजवणे तसेच मोटारसायकलींचे स्टंट करून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनेक विद्यार्थिनींनी आपली ओळख गोपनीय ठेवण्याच्या अटीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे तक्रारी केल्या असून, घरच्यांच्या भीतीमुळे त्या पोलीस ठाण्यात जाण्यास धजावत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक घटना अधिकृत नोंदीपर्यंत पोहोचत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

मनविसेने बसस्थानक व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, प्रवेश व सुट्टीच्या वेळेत विशेष पथक, महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करणे, विद्यार्थिनींसाठी गोपनीय तक्रार व्यवस्था सुरू करणे तसेच छेडछाड करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, लोहारा तालुकाध्यक्ष विवेक बब्रुवान बनसोडे यांनी सादर केले असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!