लोहारा ( जि. धाराशिव ) : तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूल व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका हिरा दयानंद सोलापूरे यांना 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी श्री नारायणी शिक्षण प्रसारक मंडळ, तुळजापूर संचलित धाराशिव टॅलेंट सर्च परीक्षा (DTSE) तर्फे ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने घेतलेले प्रयत्न, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी केलेले मार्गदर्शन तसेच शाळेबद्दलची आत्मीयता, जिद्द आणि चिकाटी याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
यापूर्वीही सोलापूरे यांना मेस्टातर्फे आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यामाता शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, शून्यातून उभे राहून यशाचे नवे शिखर गाठल्याची भावना शाळा परिसरातून व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी सोलापूरे मॅडम नेहमीच “यश हे नशिबाने नाही, तर सातत्यपूर्ण मेहनतीने मिळते”, “अपयश हा शेवट नसून यशाकडे जाणारा पहिला टप्पा असतो” आणि “यश मिळवायचे असेल तर कारणे नाही, प्रयत्न शोधा” असे प्रेरणादायी विचार मांडत असतात. त्यांच्या या विचारांचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे शिक्षक व पालक सांगतात.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विद्यामाता शाळा, धानुरी परिसर आणि संपूर्ण लोहारा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जवळगे, सचिव किशोर साळुंके तसेच ॲड. दीपक भैय्या जवळगे यांनी हिरा सोलापूरे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.