धाराशिवकृषी

अतिवृष्टी अनुदान खात्यावर जमा न झाल्यास १७ नोव्हेंबरला आष्टामोड येथे महामार्ग अडवणार — आमदार प्रविण स्वामी व शेतकरी नेते अनिल जगताप यांची घोषणा

लोहारा (प्रतिनिधी) : लोहारा-उमरगा तालुक्यातील तब्बल ४४ हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान अद्याप खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ६ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय निघूनही शासनाच्या निष्क्रीयतेमुळे ही रक्कम थकली असून, आज लोहारा तहसील कार्यालयासमोर आमदार प्रविण स्वामी व शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.

 

या आंदोलनादरम्यान आमदार स्वामी व अनिल जगताप यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “१६ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही, तर १७ नोव्हेंबर रोजी आष्टामोड (ता. लोहारा) येथे राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येईल.”

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने लोहारा-उमरगा तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना ८६ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपये मंजूर केले होते. मात्र तीन महिने उलटूनही जवळपास ४४ हजार शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पडलेले नाहीत. शासनाने केवायसी पोर्टल बंद केल्याने ‘ॲग्री स्टिक’ प्रणालीद्वारे पैसे जमा होणार की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकरी संभ्रमात व हतबल झाला आहे.

प्रशासन आणि शासनाकडे वारंवार निवेदन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने आजचे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार स्वामी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना शासनाला तत्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले.

शेतकरी नेते अनिल जगताप हे गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा देत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच लोहारा-उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले. आता हीच रक्कम खात्यावर जमा व्हावी, यासाठी ते पाठपुरावा करत असल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

या आंदोलनाला आमदार प्रविण स्वामी, शेतकरी नेते अनिल जगताप, शिवसेना तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, काँग्रेस शहराध्यक्ष सवार साहेब, स्वराज पक्ष प्रमुख महेश गोरे, संभाजी ब्रिगेडचे बालाजी यादव, शिवसेना शहराध्यक्ष सलीम शेख, महबूब गवंडी, संजय लोभे, सुजित मुळे, गणेश फत्तेपुरे, राहुल निम्बर्गी, सोमनाथ भोंडवे, निशिकांत गोरे, महेश लोभे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!