धाराशिवमहाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना विधेयकाच्या संयुक्त समितीवर आमदार प्रवीण स्वामी यांची निवड

मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र चिकित्सा आस्थापना (नोंदणी व विनियमन) विधेयक, २०२६’ या महत्त्वपूर्ण विधेयकाच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यीय संयुक्त समितीवर आमदार प्रवीण स्वामी यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे उमरगा-लोहारा मतदारसंघासाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आनंदराव आबिटकर यांनी विधानसभा विधेयक क्रमांक ५१ संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. त्यानुसार या समितीला विधेयकाचा सखोल अभ्यास करून पुढील अधिवेशनाच्या अखेरपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व वैद्यकीय आस्थापनांची नोंदणी, नियमन, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेसाठी हे विधेयक महत्त्वाचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर संयुक्त समितीवर आमदार प्रवीण स्वामी यांची झालेली निवड त्यांच्या विधिमंडळातील प्रभावी सहभागाची दखल मानली जात आहे.

या समितीमध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत, संजय बनसोडे, योगेश सागर, सिद्धार्थ शिरोळे, अनिल पाटील, प्रशांत ठाकूर, सुहास बाबर यांच्यासह विविध पक्षांतील प्रमुख लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. समितीच्या शिफारशींनंतर या विधेयकाला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!