
लोहारा : सध्याच्या मोबाईल व आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात विद्यार्थ्यांची स्वतःची विचारशक्ती, कल्पकता आणि सर्जनशीलता जपणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रथम क्रिएटिव्हिटी क्लब, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन व निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर येथे भव्य क्रिएटिव्हिटी सम मेळावा उत्साहात पार पडला.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोबाईल, टीव्ही व सोशल मीडियावर अधिक वेळ घालवत असून अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार उत्तरे सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची स्वतंत्र विचारप्रक्रिया व सर्जनशीलता मर्यादित होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या मेळाव्यात निवासी दिव्यांग शाळा, सास्तूर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजेगाव येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. चित्रकला, हस्तकला, कल्पनाचित्रे, सर्जनशील लेखन, समस्या सोडविणे, गटकार्य अशा विविध क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीजद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, निरीक्षणशक्तीचे व आत्मविश्वासाचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
मेळाव्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबच्या समन्वयक अनिता नाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी केले. यावेळी प्रथम क्रिएटिव्हिटी क्लबच्या माध्यमातून सास्तूर युवा भवनासाठी डिजिटल अॅक्टिव्हिटी डिव्हाईसचा संच प्रमुख अतिथी व मार्गदर्शिका अनिता नाडे यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे धाराशिव जिल्हा संपर्क अधिकारी सुमित कोथिंबीर होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मंडले, राजरत्न जोगदंड, जि. प. प्राथमिक शाळा राजेगाव येथील शिक्षिका ए. एम. जाधव, तसेच शतकवीर रक्तदाते भाऊसाहेब आंबेकर उपस्थित होते.



