लोहारा (प्रतिनिधी) : ( जि.धाराशिव )
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. लोहारा तालुक्यातील सास्तूर गावच्या विद्यमान सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शीतलताई राहुल पाटील यांना भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
शीतलताई पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यकाळात आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कामे केली असून, त्या काळात केलेल्या विकासकामांमुळे आणि सततच्या जनसंपर्कामुळे त्यांना जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या कार्यशैलीमुळेच २०१७ मध्ये नागरिकांनी त्यांना बहुमताने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिले होते.
यानंतर सास्तूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आल्यावर त्यांनी सातत्याने विकासाभिमुख भूमिका कायम ठेवली. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या नेतृत्वाची चर्चा आजही परिसरात मोठ्या प्रमाणात होत आहे.
दरम्यान, सास्तूर गट राखीव झाल्याने आता माकणी गटातून त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यातील भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेत त्यांना पुन्हा संधी मिळावी अशी मागणी होत आहे. तसेच, भाजपचे उमरगा-लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पक्षात त्यांच्या उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे समजते.
पक्षश्रेष्ठी आणि जनभावनेचा आदर करून भारतीय जनता पक्ष सौ. शीतलताई राहुल पाटील यांना माकणी गटातून उमेदवार म्हणून उभे करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.