सलगरा (ता. तुळजापूर) : तुळजापूर तालुक्यातील सलगरा दि. पंचायत समिती गण मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या गणातील राजकीय वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वडाचा तांडा येथील माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य लखन चव्हाण हे नाव सध्या सर्वांच्या चर्चेत आहे.
गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना चव्हाण यांनी गावाच्या विकासाचा आराखडा प्रत्यक्षात उतरवला आहे. शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास, पाठपुरावा आणि यशस्वी अंमलबजावणी यात त्यांचा हातखंडा आहे. जलजीवन मिशन, ग्रामीण रस्ते योजना, पाणीपुरवठा, शाळा दुरुस्ती, ग्रामस्वच्छता — या सर्व क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
बंजारा समाजातील तरुणांना एकत्र करून शिक्षण, रोजगार आणि सामाजिक भानाची दिशा देणारे उपक्रम त्यांनी राबवले आहेत. सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत, शासन दरबारी जनहिताचे आवाज त्यांनी बुलंद केले आहेत. त्यामुळे “लखनभाऊ म्हणजे काम करणारा माणूस” असा ठसा जनतेत तयार झाला आहे.
वडाचा तांडा परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, “चव्हाण यांनी नेहमीच गावासाठी पुढाकार घेतला; कोणताही प्रश्न छोटा नाही, हे त्यांचे धोरण आहे.” त्यांच्या प्रामाणिक आणि थेट स्वभावामुळे ते सर्वांच्या गळ्यातले ताईत झाले आहेत.
सलगरा दि. पंचायत समिती गणात सहा तांडे येतात आणि या तांड्यांमध्ये चव्हाण यांचे घनिष्ठ जनसंपर्क जाळे आहे. ग्रामपातळीपासून पंचायत समितीपर्यंत विकासाची शिडी चढण्याची त्यांची तयारी दिसून येत आहे.
राजकीय समीकरणात नव्या ऊर्जेसह प्रवेश करणारे लखन चव्हाण यांच्यामुळे सलगरा गणातील निवडणूक रंगतदार, उत्साही आणि मुद्देसूद होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
जनतेचा विश्वास, समाजाचा पाठिंबा आणि विकासाची दृष्टी — या त्रिसूत्रीवर चव्हाण यांचे पाऊल ठाम आहे.
आता या चर्चेचं रूपांतर उमेदवारीत होतं का, आणि त्यातून सलगरा गणात नवा चेहरा उदयास येतो का — याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.