लोहारा (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य श्री शहाजी महावीर जाधव यांना “संघर्ष योद्धा – राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा सन्मान आधुनिक लहुजी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूल (उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी, गुंजोटी संचलित) या शाळेचे संस्थापक सचिव व प्राचार्य म्हणून गेली बारा वर्षे ते ग्रामीण विद्यार्थ्यांना माफक शुल्कात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षण देत आहेत. कोरोना काळातील आर्थिक संकटातही त्यांनी हार न मानता विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड सुरू ठेवले. शिक्षण क्षेत्रातील याच सातत्यपूर्ण योगदानाबद्दल त्यांची राज्यस्तरीय गौरवासाठी निवड करण्यात आली आहे.
दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी धाराशिव येथील आर्यन फंक्शन हॉल येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजप आमदार मा. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आधुनिक लहुजी सेनेचे राज्य सल्लागार अॅड. अजय कांबळे यांनी दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास भोसले, संचालक श्री अशोक राठोड, शिक्षकवृंद, पालकवर्ग, मित्रपरिवार आणि नागरिकवर्गाकडून प्राचार्य जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागातील शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा मिळत असल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.