लोहारा (जि. धाराशिव) – महाराष्ट्रातील आद्य शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदिराची शारदीय नवरात्रोत्सवात भवानीज्योत गावागावात नेऊन घटस्थापना करण्याची शतकानुशतकांची परंपरा आहे. या परंपरेतून भक्तांमध्ये श्रद्धा, उत्साह व एकात्मतेचा संदेश पोहोचतो.

याच पार्श्वभूमीवर लोहारा शहरातील ‘जय जगदंबा नवरात्र महोत्सव मंडळा’च्या वतीने तुळजापूर येथून प्रतिवर्षी भवानीज्योत आणून देवींची प्रतिस्थापना केली जाते. यावर्षी भवानीज्योत तुळजापूरहून लोहारा शहराकडे प्रस्थान केली असताना आमदार स्वामी यांनी स्वतः त्या पवित्र ज्योतीला भेट दिली आणि परंपरेला बळ देत, भक्तिभावाने भवानीज्योत स्वतःच्या हाती घेऊन धावत यात सहभाग नोंदवला.यावेळी मंडळाच्या सदस्यांनी आणि भाविक भक्तांनी दिलेल्या आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो या घोषणानी परिसर दणाणून गेला होता.
लोहारा शहरात पोहोचताच भवानीज्योतीचे मंडळाच्या वतीने व नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
आमदार प्रवीण स्वामी यांनी यावेळी सांगितले की, “भवानीज्योत ही केवळ धार्मिक परंपरेचे प्रतीक नसून समाजातील एकात्मता, शक्ती व मातृशक्तीवरील श्रद्धेचे प्रतीक आहे. या परंपरेला पुढे नेणे हे आपलं कर्तव्य आहे.”
आमदार स्वामी यांनी यावेळी “शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे जे संकट ओढवले आहे त्यातून शेतकरी सुखरूप बाहेर निघू दे, ओला दुष्काळ जाहीर होऊ दे व शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ दे”याचे साकडे तुळजाभवानी चरणी घातले.
या उपक्रमातून नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रद्धा, ऐक्य व सामाजिक बांधिलकीचा संदेश देत लोहारा शहरातील नवरात्र महोत्सव अधिक उत्साही व ऐतिहासिक ठरला आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, दत्ताभाऊ शिंदे, प्रेम लांडगे, महेश कुंभार, बाळू माशाळकर,राहुल विरूदे, काका सुतार,प्रथमेश गोरे,अनिल विरुदे, शिवशरण स्वामी, मंथन जट्टे, श्रीकांत तिगाडे यासह मंडळाचे सदस्य व भविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!