उमरगा : महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उमरगा येथे आमदार मा. प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या घटक पक्षांचे जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व ग्रामपंचायतींसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत सखोल चर्चा झाली. आघाडीच्या सर्व घटकांनी एकत्रितपणे आणि सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाविकास आघाडीची संघटित ताकद जनतेपुढे प्रभावीपणे सादर होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
बैठकीदरम्यान ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामे, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, जनतेच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना यावरही चर्चा झाली. आघाडीतील सर्व पक्षांनी जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र काम करण्याचा निर्धार यावेळी केला.
“सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेच्या सेवेला आणि विकासाला आम्ही प्राधान्य देतो,” असे स्पष्ट मत आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा तालुक्यात महाविकास आघाडी अधिक एकजूट आणि तयारीत असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी निवडणुकीत आघाडी प्रभावी लढत देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.