धाराशिव (प्रतिनिधी): सन २०१५ मध्ये प्रचंड जाहिरातबाजी आणि जादा व्याजदराच्या आमिषाने उभी राहिलेली पार्वती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आता हजारो ठेवीदारांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी बँक ठरत आहे. लोहारा, सालेगाव, डाळिंब, तुरोरी, कसगी या गावांमध्ये शाखा उघडून लाखो सामान्य जनतेकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्यानंतर बँकेने दोन वर्षांपासून व्यवहार थांबवले आहेत. यामुळे ठेवीदारांना स्वतःचेच पैसे मिळेनासे झाले असून, बँकेच्या सर्व शाखा बंद पडल्यात.
सध्या लोहारा व उमरगा तालुक्यातील हजारो ठेवीदार आर्थिक अडचणीत असून, त्यांच्या जीवनभराची कमाई बँकेत अडकली आहे. यावर उपाय म्हणून आष्टा मोड (ता. लोहारा) येथे नुकतीच ठेवीदारांची बैठक झाली. बैठकीत ठेवीदारांनी एकमुखाने सामाजिक कार्यकर्ते अनिल दादा जगताप यांना पुढाकार देण्याचे अधिकार दिले. त्यानंतर आणखी एक बैठक घेऊन न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावर आंदोलन उभं करण्याचा निर्णय झाला.
याच पार्श्वभूमीवर ७ ऑगस्ट २०२५ रोजी गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करणे, अटक न झालेल्या संचालकांना तात्काळ अटक करणे, त्यांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत मिळवून देणे यासारख्या प्रमुख मागण्या ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग (ईडी), सहकार, वित्त व गृह विभागांकडे देखील यासंदर्भातील तक्रारी व याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात स्वतंत्र जनहित याचिका दाखल होणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
“ही केवळ आर्थिक लूट नव्हे, तर हजारो कुटुंबांच्या अस्तित्वावर घाला आहे. आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र यावं आणि रस्त्यावर उतरून न्याय मिळवावा,” असे आवाहन अनिल दादा जगताप यांनी आंदोलनासंदर्भात केले.
️ आंदोलनाची तारीख: ७ ऑगस्ट २०२५, गुरुवार
ठिकाण: जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव
आयोजक: पार्वती मल्टीस्टेट पीडित ठेवीदार संघर्ष समिती
✊ नेतृत्व: सामाजिक कार्यकर्ते अनिल दादा जगताप