धाराशिवदेश -विदेश
धाराशिव जिल्ह्याच्या वृक्षारोपण मोहिमेची ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद; तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर यांच्या हस्ते केक कापून उत्सव

लोहारा ( धाराशिव ) : हरित धाराशिव अभियान 2025 अंतर्गत 19 जुलै रोजी झालेल्या भव्य वृक्षारोपण मोहिमेमुळे धाराशिव जिल्ह्याने ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स – लंडन’ मध्ये आपले नाव अजरामर केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कीर्ती किरण पुजार (IAS) यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या एका दिवसात जिल्ह्यातील 293 ठिकाणी 15 लाखांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात एक लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत अभूतपूर्व योगदान दिले.यामध्ये लोहारा तालुक्याचा खारीचा वाटा आहे.
या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागातर्फे विशेष आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार श्री. रणजीतसिंह कोळेकर यांच्या हस्ते केक कापून या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी कर्मचारी वर्ग, अधिकारी आणि सहभागी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार श्री. कोळेकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “हरित धाराशिव अभियानाने केवळ वृक्षारोपणाचाच नव्हे, तर लोकसहभागाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याच्या सर्व यंत्रणांचे समन्वय, नियोजन आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे.”
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनने दिलेल्या सर्टिफिकेटनुसार 19 जुलै 2025 रोजी झालेल्या वृक्षारोपण मोहिमेची अधिकृत नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग होता.




