
लोहारा ( जि. धाराशिव ) – अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’ यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रीशताब्दी जयंती वर्षानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील कर्तबगार महिलांना ‘आदर्श माता – आदर्श नारी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माकणी येथील श्रीमती गयाबाई प्रभाकर शिंदे यांना दिनांक २३ मार्च रोजी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून उच्च शिक्षित कुटुंब घडवणाऱ्या गयाबाई शिंदे यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवले. त्यांचे पती प्रभाकर शिंदे पूर्णतः अशिक्षित होते आणि सालगडी म्हणून काम करत होते. मात्र, अपार संघर्ष असूनही त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचा निर्धार सोडला नाही. पतीच्या निधनानंतरही गयाबाई यांनी मुलांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले.
त्यांचे सुपुत्र महादेव शिंदे यांनी रसायनशास्त्र विषयात सेट, नेट (JRF), पीएच.डी. (पुणे विद्यापीठ) पूर्ण केले असून पोस्ट डॉक्टरेट (साऊथ कोरिया) येथे केले आहे. त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘भूकंपग्रस्त आदर्श विद्यार्थी’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच, ते अमेरिकेतील विशेष फेलोशिप प्राप्त संशोधक आहेत आणि सध्या वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा दुसरा मुलगा बळीराम शिंदे महसूल खात्यात कार्यरत आहे, तर तिसरा मुलगा विष्णु शिंदे पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात पीएच.डी. करत आहे. त्यांना नॉर्वे येथील यु.एस.एन. विद्यापीठातर्फे ‘इंटरनॅशनल मोबिलिटी फेलोशिप २०२३’ प्राप्त झाली आहे. सध्या ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दोन मुली सविता आणि मनीषा या शिक्षिका आहेत.
गयाबाई शिंदे यांच्या मुलांनी ‘आयसीड’ ही सामाजिक संस्था स्थापन करून गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात दिला आहे.
सदर पुरस्कार समारंभ मा. आ. राणा जगजितसिंह पाटील, मा. अॅड. मीरा कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी म. रा. शि. परिषद प्रांताध्यक्ष मा. मधुकर उन्हाळे, भाजप धाराशिव अध्यक्ष मा. नितीन काळे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख पल्लवी पिसे, सौ. अंजली काळे, सौ. दिपाली काळे, सौ. दैवशाला हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
गयाबाई शिंदे यांचा जीवनप्रवास संघर्षमय असला तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. आपल्या कुटुंबाला शिक्षणाच्या शिखरावर नेणाऱ्या या मातृशक्तीचा सन्मान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे.
Back to top button
error: Content is protected !!