धाराशिव – केंद्र शासनाच्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना केवळ 6200 रुपये प्रति हेक्टर पिक विमा नुकसान भरपाई स्वीकारण्याची वेळ आली आहे. या निर्णयाविरोधात जिल्ह्यात आठ ठिकाणी रस्ता रोको आंदोलनाची मालिका राबवण्यात येणार असून, पहिले आंदोलन 25 मार्च रोजी नारंगवाडी फाटा (ता. उमरगा) येथे होणार आहे, अशी माहिती पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी दिली.
शेतकऱ्यांची फसवणूक – विमा भरपूर, नुकसानभरपाई तुटपुंजी !
धाराशिव जिल्ह्यातील 7.19 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा भरला असून, विमा हप्त्यापोटी 596 कोटी रुपये कंपनीकडे जमा आहेत. मात्र, प्रति हेक्टर 6200 रुपये नुकसानभरपाई देण्याची तयारी सुरू आहे. यामुळे विमा कंपनीला तब्बल 339 कोटी रुपयांचा नफा होणार आहे.
अग्रीम नव्हे अंतिम विमा !
काही जण ही रक्कम 25% अग्रीम असल्याचे सांगत असले, तरी हा अखेरचा आणि अंतिम विमा आहे. मागील खरीप हंगामातही शेतकऱ्यांना फक्त 5200 रुपये प्रति हेक्टर मिळाले होते. यावर्षी पुन्हा तसाच अन्याय होत आहे.
अतिवृष्टी अनुदानातही अन्याय
धाराशिव, कळंब, वाशी आणि परंडा या चारच तालुक्यांना अतिवृष्टी अनुदान मिळाले असून, लोहारा आणि उमरगा तालुक्यांतील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळालेली नाही. तुळजापूर व भूम तालुके तर सलग दुसऱ्या वर्षी वगळण्यात आले आहेत.
परिपत्रक रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

या अन्यायाविरोधात जिल्ह्यात आठ ठिकाणी तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, पहिल्या आंदोलनाची सुरुवात 25 मार्च रोजी नारंगवाडी फाटा (ता. उमरगा) येथे करण्यात येणार आहे. परिपत्रक रद्द न केल्यास पुढील आंदोलनाची जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा अनिल जगताप यांनी दिला आहे.
Back to top button
error: Content is protected !!