लोहारा ( जि.धाराशिव ) : लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी “मराठी राजभाषा दिनानिमित्त” ग्रंथदिंडी व बाल साहित्य संमेलन संपन्न झाले.
याप्रसंगी ग्रंथदिंडीचे उद्घाटन लोहारा तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री एन.के.मोरे, पोलीस उप निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कुकलारे, नगर पंचायतचे नगरसेवक श्री अविनाश माळी, पत्रकार श्री इकबाल मुल्ला, ह. भ.प. श्री बालाजी मक्तेदार, श्री वजीर अत्तार, स्कुलचे प्राचार्य श्री शहाजी जाधव यांच्या हस्ते भारतमातेचे व ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पालखीतील ग्रंथराज ज्ञानेश्वरी व भगवतगीतेचे पूजन करून कऱण्यात आले.
यानंतर कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्कुलतर्फे मराठी पुस्तके भेट देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी राजभाषा दिनानिमित्त निघालेली ग्रंथदिंडी भारतमाता मंदिर, छ. शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, हिप्परगा रोड, जगदंबा देवी मंदिर, तहसील कार्यालय, नागराळ रोड मार्गे स्कुलमध्ये समारोप करण्यात आला. यामध्ये स्कूलमधील सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन वेशभूषा, (मुलांनी – नेहरु-पायजमा, फेटा, धोतर, टोपी, व मुलींनी साडी – चोळी, नाकात नथ, महाराष्ट्रीयन स्त्री) छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, वारकरी, महात्मा फुले, शेतकरी, वासुदेव, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर यांच्या अतिशय सुंदर वेशभुषा करून तसेच “संत महतांची वाणी – माय मराठीची गाऊ गाणी, मराठी ज्ञानाची घागर – करु मराठीचा जागर, मराठी राजभाषा गौरव दिन” असे फलक हातात धरून ग्रंथदिडीमध्ये महाराष्ट्र गीत म्हणत सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीत सहभागी सर्व चिमुकल्यानां फिनिक्स कॉम्प्युटर सेंटरचे संचालक श्री मारुती लोहार यांच्या कुटुंबियांकडून बिस्कीट देवून खाऊ वाटप करण्यात आले.
यानंतर स्कूलमध्ये बाल कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते, यामध्ये लहान चिमुकल्यांनी गोष्टी, कविता, गीत, कथा – कथन व मनोगत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. यशवंत चंदनशिवे यांनी तर आभार प्रदर्शन सविता जाधव यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी स्कुलमधील सर्व विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, सोनाली काटे, अनिता मनशेट्टी, वैशाली गोरे, ईश्वरी जमादार, मीरा माने, हेमा पाटील, सरिता पवार, सुलोचना वकील, रेश्मा शेख यांनी परिश्रम घेतले.