धाराशिव: लोहारा आणि उमरगा तालुक्यांमध्ये पवनचक्की व सौर ऊर्जा प्रकल्पांमार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माकणी, चिंचोली, करजगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी JSW पवनचक्की कंपनीने अल्प दरात २९ वर्षांच्या करारावर घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, याच परिसरात इतर कंपन्यांनी दुप्पट बाजारभावाने जमिनी खरेदी केल्या असताना, JSW कंपनीने कवडीमोल दराने जमिनी मिळवल्याने हा मोठा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे.
काही एजंट्सनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना कमी मोबदला दिला, तर कंपन्यांनी स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनही पाळले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. एवढेच नाही, तर पवनचक्की उभारणीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या इतर जमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे.
या गंभीर आर्थिक फसवणुकीविरुद्ध आणि अशा प्रकल्पांसाठी योग्य नियमावली जाहीर करण्याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. याशिवाय, लवकरच तालुका नियंत्रण समितीकडेही याबाबत तक्रार दाखल केली जाणार आहे.
या प्रकरणी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “ज्या कंपन्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करतील, त्यांच्या विरोधात आम्ही तीव्र लढा देऊ. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”
या निवेदनावर धनंजय मुसांडे, शिरीष मुसांडे, शुभम साठे, पंडित ढोणे, सिंधुबाई साठे, प्रतीक मुसांडे, प्रज्ञा मुसांडे, वैभव पाटील, विजय मला बिराजदार, पांडुरंग बिराजदार आणि फुलचंद आळंगे या शेतकरी प्रतिनिधींच्या सह्या आहेत. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील ऊर्जा प्रकल्पांच्या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.