धाराशिवमहाराष्ट्र
लोहारा-उमरगा तालुक्याच्या ७९ हजार शेतकऱ्यांना ८६ कोटींचा दिलासा; अनिल जगताप यांच्या पाठपुराव्याला यश
शासन निर्णय आजच जाहीर

लोहारा/उमरगा : खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील लोहारा व उमरगा तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना ८६ कोटी ४३ लाख रुपयांची मदत राज्य शासनाने मंजूर केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज दिनांक २९ जुलै २०२५ रोजी जाहीर झाला असून ही माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. सुरुवातीला जिल्हा प्रशासनाकडून काही तालुक्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले, मात्र त्यात लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांचा समावेश नव्हता. याबाबत अनिल जगताप यांनी तत्काळ जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०२४ रोजी उमरगा तालुक्यातील ४९,२२८ शेतकऱ्यांचे ५२ कोटी ७५ लाख व लोहारा तालुक्यातील ३०,६५२ शेतकऱ्यांचे ३३ कोटी ७० लाख रुपयांचे नुकसान असल्याचा संयुक्त अहवाल महसूल व कृषी विभागाने सादर केला.
हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला. मात्र, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुढील कारवाई न झाल्याने हे प्रकरण वर्षभर प्रलंबित राहिले. अखेर अनिल जगताप यांनी सहसचिव कैलास गायकवाड यांच्याशी थेट संपर्क साधून मंत्रालय पातळीवर जोरदार पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून शासनाने आजच लोहारा व उमरगा तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी ८६ कोटी ४३ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.
मदत विवरण:
-
उमरगा तालुका: ४९,२२८ शेतकरी – ₹५२.७५ कोटी
-
लोहारा तालुका: ३०,६५२ शेतकरी – ₹३३.७० कोटी