महाराष्ट्र
दिव्यांग शिबिरात कुणाला कृत्रिम हात मिळाले तर कुणाला पाय
लोहारा ( धाराशिव ) : दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी लोहारा येथील भारत माता मंदिरात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून लातूर जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडे, प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब पाटील, डॉ आम्लेश्वर गारठे, डॉ.हेमंत श्रिगिरे, मंडल अधिकारी जगदीश लांडगे,शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शंकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते शिबिराचे उद्घाटन भारतमाता व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून कऱण्यात आले.
हे शिबिर धाराशिव जिल्हा प्रशासन समाजकल्याण विभाग, रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना प्रकल्प, एस आर ट्रस्ट व अलिंको समूह यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. या शिबिरामध्ये नाव नोंदणी केलेल्या दिव्यांगाना जाग्यावरच लागणाऱ्या वस्तूचे मोजमाप घेवून आवश्यक त्या वस्तूचे दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात , पाय, कॅलीपर, स्पिलटं वाटप करण्यात आले.
यावेळी लोहारा तालुक्यातील खेड येथील खलील महमद शेख या 40 वर्षांच्या व्यक्तीस कृत्रिम पाय बसवल्यानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या 2 पायावर उभा राहून चालण्याचा अनुभव त्याने आयुष्यात त्याला नवीन ऊर्जा देणारा ठरेल असे सांगितले.
लोहारा येथील 23 वर्षाचा युवक राहूल युवराज गायकवाड याचे 3 महिन्यापूर्वीच अपघातात एक पाय निकामी झाले त्यालाही कृत्रिम पाय बसवण्यात आले. तसेच वैजनाथ पोटरे यांना जयपूर फूट, सरुबाई बिराजदार यांना कृत्रिम पाय, मंगलबाई बादुले यांना कृत्रिम हात, प्रणिता वाघुले हिस पायाचे केएफओ यांच्यासह एकूण 48 दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविण्यात आले.
यावेळी आलिंको समूह मुंबई येथील डॉ रुपेश जाधव, डॉ रुक्मिणी सोनेवाड , शिवेद्र ठाकूर ,राज शर्मा यांनी दिव्यांगाचे मोजमाप घेतले. तसेच लोहारा पं.स. व आरोग्य विभागातील सुनिता लोकरे, सुमन जमादार, भाग्यश्री कुंभार यांनी नाव नोंदणीचे काम केले. याप्रसंगी सक्षमचे श्रीराम शिंदे,माऊली कुंभार महाराज, दत्तात्रय दंडगुले, प्राचार्य शहाजी जाधव, प्रा यशवंत चंदनशिवे, विरेष स्वामी, श्रीनिवास माळी, भरत सुतार,मनोज तिगाडे, रमेश वाघुले, दत्तात्रय पोतदार, उत्तम पाटील, प्रशांत काळे, सुरेश तेलंग, मनोज तुगावे, यांच्यासह दिव्यांग व्यक्ती, त्यांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.