धाराशिवमहाराष्ट्र
“एक वृक्ष, आईच्या नावाने!” — एकोंडी गावात हरित धाराशिव अभियानांतर्गत 12,000 रोपांची भव्य लागवड

लोहारा : धाराशिव जिल्ह्यातील ‘हरित धाराशिव अभियान 2025’ अंतर्गत “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत एकोंडी (लो) गावठाणच्या 40 आर क्षेत्रात 12,000 रोपांची भव्य लागवड व नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोहारा-उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पार पडले.
कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी व खरीप अभियानाचे नोडल अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर, गटविकास अधिकारी जे. टी. वग्गे, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्यासह गावातील विविध खात्यांचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वृक्ष लागवड व संगोपनाबाबत सर्व नागरिक, महिला बचत गट, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांना शपथ देण्यात आली. आमदार प्रवीण स्वामी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या संकल्पनेतून 15 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, एकोंडी ग्रामपंचायतीचा सहभाग प्रेरणादायी आहे.
“झाडे जगवा, पर्यावरण वाचवा” या उद्देशाने गावाने घेतलेली पुढाकार कौतुकास्पद असून, शंभर टक्के सहभागासह 980 नागरिकांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे, असेही आमदार स्वामी यांनी स्पष्ट केले.