लोहारा / उमरगा (जि.धाराशिव ) : बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेने मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी २४ ऑगस्ट तोंडावर काळीपट्टी बांधून मूक आंदोलन केले.
अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने बंदला मज्जाव केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्थानिक पातळीवर मूक आंदोलन करून निषेध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील शिवसैनिकांनी मूक आंदोलनाची तयारी केली होती. शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिक जमा होऊ लागताच पोलिस प्रशासनाने जमावबंदी लागू असल्याचे सांगून शिवसैनिकांना मूक आंदोलनापासून रोखले. चारपेक्षा अधिकजण एकत्र येण्यास प्रतिबंध केल्यामुळे काही मोजक्याच शिवसैनिकांनी तोंडाला काळीपट्टी व हातात काळे झेंडे घेऊन मूक आंदोलन करून बदलापूर घटनेचा निषेध केला. शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, शिवदूत महेबूब गवंडी, पंचायत समितीचे माजी सभापती विलास भंडारे मूक आंदोलनात सहभागी झाले होते.