उपमहाराष्ट्र केसरी पै. सागर हरिचंद्र बिराजदार यांनी पटकावला बसवेश्वर केसरीचा मान

सुधीर कोरे / जेवळी, ता. लोहारा
वाडी वडगाव (ता. लोहारा) येथे श्री महात्मा बसेश्वर जयंती निमित्त पार पडलेल्या जंगी कुस्ती स्पर्धेत एक लाख एकावन्न हजार व चांदीच्या गदेसाठीच पहिली कुस्ती ही उपमहाराष्ट्र केसरी पै. सागर हरिचंद्र बिराजदार (पुणे) यांनी जिंकून बसवेश्वर केसरीचा मान पटकाविला. यावेळी लहान- मोठ्या अनेक कुस्त्या पार पडल्या. या फडाचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते उपविभागीय पोलिस अधिकारी पै. राहुल आवारे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानाच्या हजेरीमुळे येथील कुस्ती स्पर्धा या परिसरातील कुस्ती शौकिनासाठी एक पर्वणीच ठरली.
लोहारा तालुक्यात पैलवानांचे गाव म्हणून ओळख असलेले वाडी वडगाव येथे राष्ट्रीय विजेते पैलवान प्रा. धनराज भुजबळ यांच्या पुढाकाराने जगद्ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त मंगळवारी (ता.२५) महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे पैलवानाच्या लढतीसह जंगी कुस्त्याचे दंगल पार पडली. या फडाचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते उपविभागीय पोलिस अधिकारी पै. राहुल आवारे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते राहुल आवारे, पै. ज्ञानेश्वर गोचडे, जीवन बिराजदार, विशाल माने, राष्ट्रीय चॅम्पीयन पै. मुंतोजित सरनोबत, जिल्हा तालीम संघाचे पै. वामनराव गाते, मारुती खोबरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील भुजबळ परिवाराकडून ठेवण्यात आलेल्या एक लाख एकावन्न हजार रुपये ईनाम व चांदीची गदेसाठी उपमहाराष्ट्र केसरी पै. सागर बिराजदार (पुणे) विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै. योगेश पवार (अहमदनगर) यांच्यात लढत झाली.
यावेळी पै. सागर बिराजदार हे गदालोट डावावर विजयी झाले. तर अरुण बोडके व दत्तात्रय गिराम यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या एकावन्न हजाराची दुसरी कुस्ती ही पै. रविराज चव्हाण (पुणे) विरुद्ध पै. प्रदीप काळे (कोल्हापूर) यांच्यात झाली. यावेळी पै. रविराज चव्हाण यांनी एकलांगे डावाने विजय झाले. येथील बेळ्ळे परिवारांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या एकेचाळीच हजाराची तीसरी कुस्ती ही पै. सोनबा लवटे (कोल्हापूर) विरुद्ध पै. सिद्धू धायगुडे यांच्यात झाली यात पै. सोनबा लवटे हे विजयी झाले. यांचासह फडात यावेळी शंभर रुपयापासून ते दीड लाख रुपयांपर्यंत अनेक कुस्त्या पार पडल्या. हे मैदान तब्बल पाच तास चालले. यासाठी पंच म्हणून कामगार केसरी जीवन बिराजदार, दादा थोरे, मोहन कोरे, ब्रम्हानंद कार्ले, अरुण हावळे, सुंदर जवळगे, रामेश्वर कार्ले, गोविंद घारगे, दयानंद साळुंके, आरिफ देशमुख, गणेश जाधव यांनी काम पाहिले या कुस्ती मैदानाचे धावते समालोचन राजेंद्र देवकाते व गोविंद घारगे यांनी केली. हे मैदान यशस्वी करण्यासाठी दयानंद भुजबळ, व्यंकट भुजबळ, अंकुश भुजबळ, युवराज भुजबळ, संजय भुजबळ, गोपाळ लकडे, प्रभाकर बोडके, दिपक बेळ्ळे राहुल कानडे, मेजर गुंडू भुजबळ, प्रा. शंकर सौदागरे यांनी परिश्रम घेतले.
प्रा. धनराज भूजबळ, राष्ट्रीय विजेता पैलवान, वाडी वडगाव
या मैदानात महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे पैलवानाच्या लढती झाल्या. यातून कुस्तीचा प्रसार व प्रचार व्हावा या बरोबरच महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे मैदाने होतात तशाच पध्दतीचे मैदान उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण व्हावेत, ग्रामीण भागातील पैलवानांना अदयावत कुस्ती कौशल्य व तंत्र आत्मसात करता यावे, तसेच या भागात पुन्हा पैलवानकीला चांगले दिवस यावेत यासाठी या कुस्ती स्पर्धा आयोजनाचा हेतू असल्याचे सांगितले