लोहाऱ्यात शासन आपल्या दारी अभियानास प्रारंभ

लोहारा : लोहारा शहरात शुक्रवारी (दि.९) महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ज्ञानराज चौगुले होते. या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार संतोष रुईकर, युवा नेते किरण गायकवाड, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, उपनगराध्यक्ष आयुब शेख, भास्कर बेशकराव, डॉ. गोविंद साठे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेश गायकवाड, नगरसेविका सारिका बंगले, शामल माळी, आरती कोरे, अविनाश माळी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंत जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रहीम शेख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, वनपरिमंडळ अधिकारी बी. पी. मुदाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एन. पचरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि.९) हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये नवीन आधारकार्ड काढणे, दुरुस्ती करणे, नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, शिधापत्रिकेवरील नाव कमी करणे / नाव वाढविणे, जीर्ण / खराब शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ / विधवा / दिव्यांग राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना , नवीन वीज कनेक्शन अर्ज स्वीकृती ( घरगुती), वीजबिल दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी करणे, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज भरणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती, जन्म मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अर्ज स्वीकृती यासह इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत वनपरीक्षेत्र सामाजिक वनीकरण – ८, तालुका आरोग्य अधिकारी – ३०, महीला व बालकल्याण विभाग – ४२, पंचायत समिती – ९१, लोहारा नगरपंचायत – ७९, गटशिक्षणधिकारी कार्यालय -५०, पशुसंवर्धन कार्यालय – ५५, तालुका कृषी अधिकारी कार्यालय – २९, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय – १७८, ग्रामिण रुग्णालय लोहारा – ३ तर तहसिल कार्यालया अंतर्गत विविध विभागातील योजना व प्रमाणपत्र असा १७६२ जणांनी लाभ घेतला अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी गणेश पवार आदिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी मंगल कार्यालयाबाहेर विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल उभारण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले. सूत्रसंचालन कमलाकर येणेगुरे, भीमाशंकर डोकडे यांनी केले.